ताज्या बातम्यादेशबातमीराजकियराज्य
काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेच्या वाघाची डरकाळी; उद्धव ठाकरे म्हणाले..

सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम सुरु केले आहे. याच पार्श्वभूमीवरती देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बुधवार (ता.२६) संवाद साधला.
या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. त्यावेळी या बैठकीत कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंचे खूप कौतुक केले. या कौतुकाचे आभार मानत, “मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे.” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सोबतच उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचे की, त्यांना घाबरून रहायचे हे आधी ठरवले पाहिजे, असेही मत मांडले. तसेच या बैठकीत कोरोना, जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्द्यांवरही चर्चा केली.
दरम्यान या बैठकीत काँग्रेसचे चार तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यामध्ये उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, कॅप्टन अमरिंदर सिंह, अशोक गहलोत, हेमंत सोरेन, व्ही. नारायणस्वामी आणि भूपेश बघेलही उपस्थित होते.