कथा
Online Love & Twist

स्वतःची इंस्टाग्राम फिड चेक करत असताना एक प्रोफाइल समोर दिसला. जेनेलियाचा फोटो असल्याने मी प्रोफाइल ओपन केला. कारण जेनेलिया माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे. प्रोफाइल ओपन केल्यानंतर त्या प्रोफाइल मध्ये फक्त दोनच पोस्ट होत्या आणि शून्य फोलोवर. प्रोफाइल तर खूप जुना वाटतं होता म्हणून मी फॉलो करून हाय असा मेसेज केला. कारण माझ्यामते काही मुली स्वतःची ओळख ऑनलाईन दाखवत नाहीत. ह्या दूनियेत यायला त्या घाबरत असतात. असाच कुणा मुलीचा प्रोफाइल असेल म्हणून मी फॉलो रिक्वेस्ट टाकली होती.
तीन दिवसांनी समोरून मेसेज आला कोण आपण? मी माझ्याबद्दल सांगितले. माझी माहिती मी खरी आहे तीच सांगितले कारण आजकाल लोकं खोट्या गोष्टी सांगायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांनी मला सक्त विचारले मला का फॉलो केलं तुम्ही? मी तर तुमच्या ओळखीत सुद्धा नाहीये. मी सुद्धा लगेच उत्तर दिले, अहो तुमच्या अकाऊंटवर जेनेलियाचा फोटो पाहिला म्हणून तुम्हाला फॉलो केलं. जेनेलिया माझी क्रश आहे.
ओके ओके ठीक आहे पण मी असे कुणाशी ऑनलाईन बोलत नाही. प्लीज तुम्ही मला मेसेज करू नका आता. हा त्यांचा शेवटचा मेसेज ह्यांनातर त्यांनी कधीच मेसेज केला नाही. पण मी रोज त्यांना गुड मॉर्निंग गुड नाईट करत होतो. कमीत कमी एक वर्षभर तरी फक्त मीच मेसेज करत होतो. पण एक दिवस मात्र त्यांचा समोरून मेसेज आला. तुम्ही ना सुधारणार नाहीत ना? रोज काय करता मेसेज मला? आणि ते ही न चुकता, अजुन तुम्ही मला पाहिले सुद्धा नाही तरीही एवढे करता. का असे का करता?
कसे आहे आम्ही कुणासोबत मैत्री केली की ती लवकर तोडत नाहीत, त्यात तुम्ही जेनेलियाचा फोटो डीपीवर ठेऊन अजुन काळजात हात घातलात. त्यामुळे लवकर तर तुमचा पाठलाग मी सोडणार नाही. असे नका बोलू तुम्ही कारण तुम्हाला माझ्या बद्दल काहीच माहीत नाहीये. एक फोटो पाहून तुम्ही निर्णय बांधू नका. कदाचित सत्य कळल्यावर तुम्ही मला मेसेज सुद्धा करणार नाहीत.
अहो मॅडम कोणत्याच फळाची अपेक्षा न करता गेली अनेक महिने मी तुम्हाला मेसेज करतोय. कितीही बिझी असलो, कितीही मोठा सण असला, आजारी असलो तरी तुम्हाला मेसेज करायचे सोडले नाही. मग तुम्हाला उगाचच असे वाटत आहे की मी आता लांब जाईल. चला तुम्हाला एक प्रॉमिस करतो मी, मला माहित सुद्धां नाही तुम्ही कोण आहात काय करता? किती वय आहे? कशा दिसता? तरीही मी तुम्हाला एक दिवस कॉफी प्यायला घेऊन जाईल.
त्यांनी हसण्याचे ईमोजी पाठवले. खरतर माझ्या बाबतीत असेच होतं. लोक बोलतात खूप पण माझे सत्य कळल्यावर कुणी जवळ सोडा लांबूनच पळ काढतात. काहींनी तर ब्लॉक केल्याचे ही अनुनभव आहेत मला. तुमच्या माहिती साठी सांगते मी २५ वर्षाची तरुणी आहे. पुण्यात राहते, सध्या MBA करतेय, सुंदर सुद्धा आहे पण मी दोन्ही पायाने अपंग आहे. मला व्हीलचेअर शिवाय कुठेच जाता येत नाही. मला माहित आहे तुम्ही सुद्धा आता मला रिप्लाय करणार नाही. सर्वांची प्रवृत्ती तीच आहे.
त्यांचा मेसेज वाचून मलाही खूप वाईट वाटले. एवढ्या कमी वयात त्या खूप काही सहन करत आहेत. अहो मग काय झालं तुम्ही व्हीलचेअरवर आहात तर आणि तुम्हाला उठता येत नसेल तर, आपल्याला कॉफी तोंडाने प्यायची आहे ना मग ह्याचा प्रश्न येतोच कुठून. मला माहित होते त्यांच्या डोक्यात माझ्या रिप्लाय वेगळा असेल अशी अपेक्षा होती. पण मी विषय मारून नेला.
माझ्या मनात आले असते तर हे सर्व ऐकुन मी मेसेज करणे बंद केले असते. पण मला माहित होत की त्यांच्या आयुष्यात असे जवळचे मित्र मंडळी कुणीच नाहीये. एकांत काय असतो हे त्यांनाच विचार ज्यांच्याकडे सर्व असून सुद्धा एकांत सुद्धा असतो. ठरल्याप्रमाणे मी एक दिवस पुण्यात जाऊन त्यांची भेट घेतली. खूप सुंदर,मनमिळावू अशी त्यांची वृत्ती होती. त्यांच्या आई बाबांची परवानगी घेऊन मी त्यांना कॉफी घेण्यासाठी कॅफे वर घेऊन गेलो. पहिल्यांदा असे कुणासोबत त्या बाहेर पडल्या होत्या.
आज त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते.
लेखक : पाटीलजी