कथा

सावली

आज मी एका नवीन कंपनीमध्ये कामाला लागलो. कंपनी च्या ऑफिस स्टाफ मध्ये २० स्टाफच्या ग्रुप मध्ये माझी निवड झाली होती. पहिल्या कंपनीत जवळ जवळ पाच वर्ष काम केले आणि दिले सोडून. कारण इतके वर्ष होऊन सुध्दा मालकाने एक रुपयाने सुद्धा पगार वाढवला नव्हता. घरातल्यांनी आणि मलाही थोडी तरी पगार वाढीची आशा होती. यात काहीच गैर नाही. सर्वानाच ती आशा असते. आणि म्हणून काही दिवसांपूर्वीच नवीन इंटरव्ह्यू दिला आणि आज जॉईनही झालो. नाही म्हटलं तरी पाच वर्षाचा अनुभव होता. त्यामुळे लगेच हा नवीन जॉब मिळाला. तसेच सहा हजार रुपये मला या पगारात जास्त मिळणार होते. त्यामुळे मी थोडा आनंदातच होतो.

पहिलाच दिवस असल्यामुळे थोडा घाबरलो होतो. शिवाय जुन्या कंपनीमध्ये जे काम करत होतो. तेच इथे करायला मिळेल असे नाही. म्हणून ह्रदयची धडधड थोडी वाढली होती. सगळेच नवीन चेहरे होते. सुंदर सुंदर मुलीही होत्या. वा..किती सुंदर मुली आहेत. त्यांचा मेकअप बघून तर अंगावर काटा येत होता. कारण इतका मेकअप केलेला चेहरा पहिल्यांदा कधी पाहिलाच नव्हता. जरी पहिल्या कंपनीत कामाला होतो तेव्हा तिथे मुली नव्हत्याच शिवाय प्रवासात असायच्या पण इतक्या भारी नव्हत्या. आजतर माझ्या जवळच्याच टेबलावर इतक्या सुंदर मुली पाहून खूप घाम फुटला होता. घाम पुसून पुसून रुमाल ही ओला झाला होता. तोही इतक्या फुल एसीमध्ये काय म्हणाल या माझ्या परिस्थितीला?

माझ्या मदतीला एक मुलगी ठेवली होती. म्हणजे दोन ते तीन दिवस ती मला थोड काम शिकवणार होती. पण ती अजुन आली नव्हती. काही माझ्याकडे बघून कोणी हाय करत होते तर कोणी फक्त हसून माझ्यासोबत ओळख झाली हे दर्शवत होते. पण माझ्या टेबल जवळ बसणारी ती मुलगी अजुन का नाही आली? म्हणून मी शेजारच्या एका व्यक्तीला विचारले. तो म्हणाला ती आज थोडी उशिरा येणार आहे. म्हणून मी तसाच माझ्या खुर्चीत बसून तिची वाट पाहत बसलो. कारण पहिलाच दिवस आणि काय करायचे हे मला माहीत नव्हते. त्यामुळे मी फक्त आजूबाजूचा परिसर न्याहाळीत होतो.

जवळ जवळ एक तास असाच निघून गेला आणि ती आली दिसायला थोडी जाड वाटत होती. वाटलं चेहरा तरी गोरा असेल पण जेव्हा चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला तेव्हा त्या जागी कोणी सुंदर मुलगी वगैरे नव्हती. जसे मी विचार केला होता वाटलं होत एखादी सुंदर मुलगी असेल आणि तिच्यासोबत हे दोन तीन दिवस मस्त मजेत जातील. शिवाय पुढची सेटिंगही करू शकतो. पण ह्या मुलीकडे पाहिले आणि त्या सगळ्या स्वप्नांवर धबधबा पाणी कोसळले. आता ते सेटिंग बेटिंग राहिले बाजूलाच आता फक्त कामापुरते तिच्याशी बोलायचे असे ठरवले. कारण तिच्याशी बोलायची इच्छाच आता उरली नव्हती. ती जाड भिंगाचा चष्मा आणि ती मुलगी दिसायला नुसती सावळी आणि थोडी जाड ही होती. त्यामुळे तिच्याकडे मीच काय पण कोणीच तशा नजरेने पहायची हिम्मतही करत नसेल.

पहिला दिवस आणि ती मुलगी कसं काय मी तिच्यासोबत हे तीन दिवस काढणार होतो हे त्या देवालाच माहीत. तिने स्वतःहूनच मला हाय केले. मग मलाही जबरदस्तीने हाय करावे लागले. तसा तिचा आवाज खूप गोड होता अगदी तिच्या शरीरा विरूद्ध, तिने तिची ओळख सांगितली. माझे नाव संगीता. मला या जॉब जवळ जवळ सहा वर्षे झाली. येथील सगळे लोक खूप चांगले आहेत. हळू हळू त्यांची ओळख तुम्हालाही होईल. मी फक्त माझे नाव सूरज आहे इतकेच बोललो आणि लगेच म्हणालो आपण कामाला सुरुवात करुया का? कारण तिच्याशी जास्त बोलण्याची मला गरज वाटत नव्हती.

पहिल्या दिवशी तिने थोड फार शिकवले आणि जेवायची सुट्टी झाली. माझी बॅग चेक केली तर आज मी घाईघाईत डब्बाच आणला नव्हता. हॉटेलही लांब होते त्यामुळे मुकाट जाऊन टेबलावर बसलो. पण काहीवेळाने ती आली ती म्हणजे संगीता म्हणाली, जेवत नाही का तुम्ही? मी म्हणालो नाही मला भूक नाही. त्यानंतर ती काहीच बोलली नाही आणि तिथून निघून गेली. तिचा डब्बा घेऊन आली मी नको नको म्हटलं तरी तिने जबरदस्तीने चपाती आणि भाजी माझ्या जवळ एका डिश मध्ये आणून ठेवली. आणि ती सुद्धा माझ्या शेजारीच खायला बसली. म्हणाली खाऊन घ्या नंतर भूक लागेल म्हणून आताच खाऊन घ्या.

मला माहित आहे तुम्ही असे का वागता माझ्यासोबत, तुम्हीच नाही इथे असलेला प्रत्येकजन याअगोदर असेच वागायचं माझ्याशी, पण आता ते थोडे बरे वागतात. मला माहित आहे मी दिसायला तितकी बरी नाही सावली आहे. शिवाय जाडी आहे. त्यामुळे माझ्याशी बोलायला आणि मैत्री करायला ही कोणालाच आवडणार नाही. कदाचित तुम्हाला ही. पण हे रूप मला जन्मजात मिळाले आहे आणि त्याचा मला तरी मुळीच राग येत नाही. जे आहे ते माझे देवाने दिलेलं रूप आहे ते मी स्विकारले आहे. असे बोलून तिने तिचा रिकामा झालेला डब्बा एका पिशवी मध्ये भरला आणि ती उठून बाहेर गेली. मला तर खरच तिच्या या बोलण्यामुळे तिच्याबद्दल आता तिरस्कार नाही तर सहानुभूती निर्माण झाली होती.

आता तिच्याशी मी फ्रीली बोलायला लागलो. तीन दिवस कसे निघून गेले ते कळलेच नाही आणि या तीन दिवसात ती दिसायला जरी तशी असली तरी खरंच ती मनाने खूप चांगली होती. कारण मी कितीही वेळा तिला प्रॉब्लेम विचारले तरी ती चेहऱ्यावर कोणतेच रागाचे भाव न आणता अगदी आनंदात सांगत होती. म्हणून मी तिच्यासोबत लगेच मैत्री ही केली. आता ऑफिस चालू होऊन जवळ जवळ एक महिना झाला होता आणि मी ही चांगला रुळलो होतो. आमच्यातील मैत्री ही थोडी अधिक घट्ट झाली होती. एक दिवस मी कामाला गेलो नाही तर तिने लगेच समोरून फोन केला. मी म्हणालो माझी आई खूप सीरियस आहे ती हॉस्पिटल मध्ये एडमीट आहे, ती संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर लगेच माझ्या आईला भेटायला हॉस्पिटल मध्ये आली.

कोण अस जात असेल का लगेच हॉस्पिटल मध्ये पाहायला? आणि ती तर माझी आई होती. तरीही ती आली, येताना फळं ही घेऊन आली होती. माझ्या नातेवाईका सोबत ती अगदी आपुलकीने बोलली. त्या दिवसापासून ती माझी बेस्ट फ्रेंड झाली होती. म्हणजे कदाचित ती मला आवडू लागली असेल. हो म्हणजे आता ती माझ्या जरा जास्तच जवळ आली होती. म्हणतात ना ज्या व्यक्तीसोबत आपण जास्त वेळ घालवतो ती व्यक्ती हळू हळू आपल्याला आवडू लागते.

मला आता खरंच तिच्या रंगाशी आणि रूपाशी काहीच घेणेदेणे नव्हते. कारण आता मला तिचा स्वभाव आवडत होता. दोन दिवसांनी व्हॅलेंटाईन डे होता. म्हटलं हा दिवस तिच्यासोबत मस्त आनंदात घालऊ. पण पहिल्यांदा त्याच दिवशी तिला मी अगोदर प्रपोज करणार, त्याच दिवशी सकाळी ती ऑफिस मध्ये आली. माझे लक्ष तिच्याकडेच होत. तिने माझ्याकडे एक नजर टाकली आणि हसली मी ही हसलो. थोड्या वेळाने ती माझ्याजवळ आली माझ्या हातात एक कार्ड ठेवले मला वाटलं ग्रीटिंग वगैरे असेल तर मागे पुढे करून पाहिली तर लग्न पत्रिका होती आणि ती सुद्धा तिच्याच लग्नाची.

पत्रिकेवर तीच नाव पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आले. पुढे मी सुद्धा काहीच बोलू शकलो नाही. अख्खा दिवस मी गप्प बसून काम करत होतो. तरीही संध्याकाळी मी तिच्याजवळ गेलो आणि म्हटलं कसा दिसतो तुझा नवरा? कोण आहे तो? तिने मला फोटो दाखवले. अरे वयाने तिच्यापेक्षा जवळ जवळ २० ते २५ वर्षांनी मोठा असेल असे बघून तरी वाटत होत. याच पाहिलं लग्न झालेले असावं हे सर्व बघून मला तर काय करावे तेच कळत नव्हते.

दोन दिवस खूप विचार केला. पंधरा दिवसांनी तीच लग्न आहे. काय करू कशातच मन लागत नव्हते. माझ्या घरातले ही टेन्शन मध्ये होते. कारण त्यांना माझी ही दशा पाहवत नव्हती आणि काय झालंय ते ही मी अजून कोणाला सांगितलं नव्हत. मग आईने खोदून खोदून विचारले तेव्हा मी सांगितले, आई म्हणाली टेन्शन घेऊ नकोस मी आणि तुझे बाबा उद्याच त्यांच्या घरी जातो आणि लग्नाची मागणी घालतो. पाहिले आहे मी त्या मुलीला मला तरी खूप चांगली वाटली.

दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा संगीताच्या घरी मागणी टाकायला गेले. सगळ्यांना हे लग्न मान्य होत फक्त तिच्या वडिलांचा तितका नकार होता. त्यांचं म्हणणं होत की इतकी सर्व तयारी झाली शिवाय पत्रिका ही वाटल्या आहेत मग हे लग्न मोडणे अशक्य आहे, सगळ्यांनी खूप समजावले पण ते कोणाचेच ऐकायला तयार नव्हते. मग मी एक दिवस गेलो आणि आणि त्यांची समजूत घातली म्हणालो एकतर तो मुलगा संगीता पेक्षा दुप्पट वयाचा आहे. शिवाय त्याच पहिलं लग्न ही झाल आहे आणि संगीताचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे हे लग्न करून ती सुखी तर मुळीच होऊ शकणार नाहीं आणि राहिला प्रश्न सगळ्या तयारीचा तर आपल्याला फक्त त्या मुलाला नाही म्हणायचं आहे. मग आमचं दोघांचं लग्न करूया ना त्याच मांडवात.

खूप समजल्यानंतर तिचे बाबा ही तयार झाले. खरी कसोटी होती त्या मुलाला समजवायची. सर्वांनी त्याला खूप समजावलं पण तो लग्न मोडण्यासाठी तयार नव्हता. अखेर त्याने एका अटीवर लग्न तोडले. लग्नासाठी झालेला सर्व खर्च त्याला हवा होता. तो खर्च त्याला मिळाल्यावर तो त्यांच्या आयुष्यातून लांब गेला. काही दिवसांनी सगळ्यांच्या सहमतीने आमचे दोघांचे लग्न ही झाले. आज लग्नाला ८ वर्ष झाली आहेत संगीता आता पहिल्यापेक्षा थोडी बारीक झाली आहे. पण आता ही तिच्यावरचं प्रेम कमी झालेले नाही भलेही कितीही सुंदर मुली माझ्या समोर आल्या.

Image Credit : Star Pravah

लेखक : पाटीलही

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close