कथा

निसर्ग वादळ, ते २ दिवस

आज पहाटे साडेचार वाजता एका जवळच्या नातेवाईकांचा फोन आला. मी गाढ झोपेत होतो. त्यांनी सांगितलं की, आज येणाऱ्या वादळाचा जास्त फटका ज्या काही गावांवर बसणार आहे त्यात आपलसुद्धा गाव आहे. त्यामुळे प्रशासनाची गाडी रात्री अडीच वाजता येऊन सगळ्यांना योग्य ती काळजी घेण्यासाठी सूचित करून गेली होती. सकाळपासूनच सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळी ह्यांचे फोन चालूच होते. सकाळी ८ वाजता गॅलरीतून मी गावातील सगळं दृश्य बघत होतो. थंडगार वारा सुटला होता. झाडांची हालचाल नेहमीपेक्षा जास्त होती. जीवितहानी होऊ नये म्हणून लाईट तर कालपासूनच घालवण्यात आली होती. मात्र आज बँक चालू असल्याने मला घरातून बाहेर पडणं गरजेचं होतं. सगळ्यांचा विरोध डावलून मी देवापुढे नतमस्तक होऊन घराबाहेर पडलो.

दुपारी १२ पर्यंत हे निसर्ग वादळ अलिबाग मध्ये येणार असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. अजून दोन तास होते. वातावरणात हळू हळू बदल दिसून येत होते. आता जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला होता. मी माझ्या सहकाऱ्याला अर्ध्या रस्त्यातून पिकअप केले आणि दोघेही अलिबाग मध्ये पोचलो, परिस्थिती अजूनच गंभीर होत चालली होती. परिस्थितीचा आढावा घेऊन आमच्या बँकेने लगेच आमची शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला. लगेचच आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. सहकारी मित्राला वाटेतच असलेल्या त्याच्या घरी सोडले. वाऱ्याचा वेग अजूनच वाढलेला होता, झाडांच्या काही फांद्या रस्त्यावर आल्या होत्या, कधी कोणतं झाड गाडीवर पडेल ह्याची शाश्वती नव्हती. मी जसा जमेल त्या वेगाने गाडी चालवत घर गाठले.

आता निसर्ग चक्रीवादळाला सुरुवात झाली होती. मुसळधार पाऊस आणि सोबत सोसाट्याचा वारा ह्या सगळ्यांमुळे मनात भितीच वातावरण तयार झालं होतं. आमच्या घराच्या आजूबाजुला पाऊस आत न येण्यासाठी लावलेले कापड आणि पत्रे कुठच्या कुठे उडून गेले. प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद केले होते की जेणेकरून कुठूनही हवा आत येऊ नये. दुपारी दोनच्या सुमारास निसर्गाचा प्रकोप अजूनच वाढत गेला. आजपर्यंत भुताच्या पिक्चर मध्ये पाहिलं होतं तसाच प्रकार आज घडत होता. वाऱ्याच्या वेगामुळे दरवाजा आणि खिडक्या बंद असूनसुद्धा जोरजोरात बाहेरून आपटत होत्या. जणूकाही बाहेरून कोणीतरी जोरजोरात ठोकून आत येण्याचा प्रयत्न करत होतं. तेवढ्यात आमच्या छपरावर काहीतरी येऊन पडले त्याचा तो भयानक आवाज ह्या सगळ्यामुळे अवस्था एकदम बिकट झाली होती. ह्या अश्या वेळी आपल्याला आठवण येते ती फक्त देवाची… तोच सगळं हे बाजूला करणार होता असा विश्वास होता.

संध्याकाळी साडेचार नंतर हळूहळू पाऊस कमी झाला, वाऱ्याचा वेग मंदावला. प्रत्येकजण आता घरातून बाहेर पडण्याचे धाडस करत होते. आपलं त्याचप्रमाणे अजून कोणाचं काय काय नुकसान झालं ह्याची विचारपूस चालू होती. ती संध्याकाळ सगळ्यांसाठी एक भयाण संध्याकाळ होती. लाईट गेली होती, मोबाईलला नेटवर्क नव्हते, आजूबाजूच्या गावात, नातेवाईकांची चौकशी सुद्धा करू शकत नव्हतो. पाऊस अजूनही चालू होता. ती रात्र एकदम भयावह वाटत होती. इन्व्हर्टर कधीच संपले होते. त्यामुळे खूप वर्षांनी आज कॅडल लाईट डिनरचा आस्वाद घेतला. आमचे जुने दिवस आठवले.

दुसऱ्या दिवशी बँकेत जायला निघालो आणि जे चित्र पाहिलं त्यामुळे मनाला खूप वाईट वाटले. कित्येक घरं जमीनदोस्त झाली, घराचे छप्पर, काही पत्रे, कुठे कुठे कौलं उडून गेली होती. कित्येक ठिकाणी जुने महाकाय वृक्ष उन्मळून पडले होते, काही झाडांच्या फांद्या पिळवटून तुटल्या गेल्या होत्या, मोठमोठे लोखंडी होर्डिंग्ज पूर्णपणे वाकले होते, रस्त्यावर सगळीकडे तुटलेल्या फांद्या आणि झाडांची पाने विस्कटलेली होती, ज्या भाजीच्या धंद्यावर उदरनिर्वाह चालायचा ते दुकानंच तिथे राहिले नव्हते, चहाच्या टपरीवर मोठे चिंचेचे झाड पडून त्या टपरीचा चक्काचूर झाला होता, कोणाच्या घरावर झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दुकाने व त्याच्यासमोर असलेल्या पाट्या सगळंच अस्ताव्यस्त झालं होतं. दुकाने तुटली, भाज्यांचे मांडव आडवे झाले, उदरनिर्वाहाची साधनं संपली. तरीही शासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतःच संयम स्फूर्तीने सगळेजण कामाला लागले होते. प्रत्येकजण ह्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. नवीन पत्रे आणि दुरुस्तीसाठीच्या वस्तू विकत घेण्यासाठी सगळेजण बाहेर पडले, परंतु लॉक डाऊन मुळे पुरेसे पत्रे आणि वस्तू न मिळाल्याने अजून किती दिवस पावसात काढावे लागतील ह्याचा अंदाज नाही.

हे सगळं बेरंग झालेलं चित्र बघून मनात एकच विचार येतो. हे परमेश्वरा, ती झाडं तुझी होती, तो वारा आणि पाऊस तुझा होता. तू शेकडो वर्षे सांभाळून ठेवलेली झाडं स्वतःच पाडून टाकलीस.! तू स्वतःच निर्माण केलेल्या सृष्टीची अशी नासधूस का? का तुझा प्रकोप वाढला. तू जीवितहानी केली नाहीस पण तुझ्या सृष्टीचं जे नुकसान केलंस हे बघून आज मन गहिवरून आलंय. ह्या सगळ्यांची आम्हाला नितांत गरज आहे. कोरोना आणि निसर्ग वादळ ह्यातून आम्हाला तू बरंच काही शिकवून गेलास. आता ह्या सगळ्यातुन बाहेर पडण्यासाठी तूच शक्ती आणि सामर्थ्य दे. पुन्हा एकदा नव्याने सगळं निर्माण करण्याची ताकद तूच दे.

श्री. अतिष म्हात्रे
आगरसुरे- अलिबाग
मोबाईल- ९७६९२०९९१९
(व्हाट्सएप साठी)

समाप्त

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close