मनोरंजन
कॉलेज एकांकिका, लेखक, गीतकार आणि निर्माता असा थक्क करणारा प्रवास

“नाव स्वामींचे येता माझ्या ठायी रे…मन नरसोबाच्या वाडीला जाई रे…” हे स्वामीगीत जवळपास सगळ्याच स्वामीभक्तांना पाठ आहे. २०१७ साली डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी केलेल्या फेसबुक लाईव मधून घरोघरी पोहोचवलं. परंतु हे गाणं ज्यांनी लिहलंय त्यांचं नाव तुम्हाला माहित आहे का ? नारायण विठ्ठल पोकळे हे आहे त्या स्वामी गीताच्या गीतकाराचं नाव. नारायण यांचा जन्म १० मार्च १९८८ रोजी मुंबई येथे झाला. यांनी त्यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले.

कृषीमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी पुढे कृषी पदवीधर व्हायचे ठरवलं आणि पुढील शिक्षण त्यांनी छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ,ओरोस ,जिल्हा सिंधुदुर्ग या दापोली कृषी विद्यपीठाशी संलग्न महाविद्यालयात २०१० साली पूर्ण केले. नारायण यांना कलेची आवड ही खूप आधीपासून होती. त्यांनी अनेक एकांकिकेमध्ये अभिनय करून त्या एकांकिका स्वतः लिहल्या आणि बसवल्या सुद्धा. लिखाणाची आवड असलेल्या नारायण यांनी पदवी पुर्ण होताच २०११ पासून रंगभूमी आजमावायला सुरवात केली.
त्यांनी लिहलेलं पाहिलं गाणं “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..” आणि अशीच काही गाणी घेऊन २०१३ मध्ये “लेकरे स्वामींची गाती” हा भक्तीगीतांचा कार्यक्रम आपल्या कलाकार मित्रांसोबत सुरू केला. नारायण यांच्या स्वामी भक्तीची सुरुवात नरसोबाच्या वाडीपासून झाली असं ते सांगतात, त्यामुळेच “नाव स्वामींचे येत माझ्या ठायी रे” या गाण्याच्या पुढच्या ओळी “मन नरसोबाच्या वाडीला जाई रे” अश्या आहेत. नारायण यांनी लिहलेल्या स्वामी गीतांचा डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेला अल्बम २२ एप्रिल २०१७ रोजी “स्वामी कृपा” या नावाने प्रेक्षकांच्या भेटीस आला.
या अल्बम मधली गाणी स्वतः डॉ. सलील कुलकर्णी यांच्या सोबतच राहूल देशपांडे आणि शौनक अभिषेकी अश्या दिग्गज गायकांनी गायली आहेत. मुळातच नारायण स्वतः स्वामीभक्त आणि संगीत प्रेमी असल्याने इथेच न थांबवता त्यांनी स्वतः “चिनार निर्मिती” या संस्थेची स्थापना करून वेगवेगळे कार्यक्रम प्रेक्षांसमोर आणलेत. चिनार निर्मिती या संस्थेमधून पहिला बासरीवादनाचा कार्यक्रम ४ जानेवारी २०१८ रोजी “अलगुजाचे हितगुज ” या नावाने कणकवली येथे सादर केला गेला. “लेकरे स्वामींची गाती” हा डॉ. सलील कुलकर्णी आणि सिद्धेश गुरव यांनी संगीतबद्ध केलेला स्वामी गीतांचा कार्यक्रम चिनार निर्मिती ने सातत्याने चालू ठेवला आहे.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुद्धा नारायण करतात शिवाय सुरुची आणि रविकिरण अश्या आपल्या मित्रांसोबत कार्यक्रमाची निर्मिती सुद्धा करतात. याच कार्यक्रमाचा भाग असलेले “पाहुनिया रूप तुझे मन दंग झाले” हे स्वामिगीत राहुल देशपांडे यांच्या आवाजात लवकरच रसिकांना ऐकायला मिळेल अशी घोषणा खुद्द राहुल देशपांडे यांनी चिनार निर्मितीच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून केली. लॉक डाऊन संपल्यावर हे गीत आपल्याला पाहायला मिळेलच.
फक्त स्वामी समर्थांचीच नाही तर गणपती, श्री विठ्ठल या हि देवतांची गाणी नारायण यांनी लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली गणेश वंदना लॉक डाऊन मध्ये युट्युब वरून प्रसारित देखील झाली आहे.
या व्यतिरिक्त सुरेश भटांच्या गीतांची मैफल असलेला तन मन अमृत बनते ग हा देखील कार्यक्रम लवकरच ते निर्माते म्हणून लोकांसमोर घेऊन येणार आहे. कॉलेज एकांकिका लेखक ते गीतकार आणि निर्माता हा त्यांचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. त्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा.