कथा
मेट्रोत भेटलेली अनोळखी ती

साकीनाका मेट्रो स्टेशन आलं तरीही ती आजसुद्धा मेट्रो मध्ये चढली नव्हती. मन अस्वस्थ झालं कारण रोज तिला पाहण्याची सवय झाली होती. तिच्या त्या रोज होणाऱ्या दर्शनामुळे माझा संपूर्ण दिवस चांगला जात होता. ती कुठेतरी जॉब करत होती. मेट्रो मध्ये चढल्यावर नेहमी शांत असायची. कधीच कुणाशी बोलत नसायची. हा एक मात्र आहे की ती नेहमी शेवटची पाच मिनिटे तिच्या स्टेशन वर उतरायला वेळ असताना फोनवर बोलायची. ह्या दीड महिन्याच्या कालावधीत मी नेहमी तिचे फोनवरचे बोलणे ऐकले होते.
खरतर मी जाणीवपूर्वक असे मुद्दामहून ऐकले नव्हते पण तिचा तो छोटा फोन असल्याने त्यातून आवाज बाहेर यायचा. कदाचित आवाज कमी करणे तिला जमत नसावे किंवा त्या फोनचा आवाजच तसा होता. जेव्हा त्या फोनची रिंग वाजायची तेव्हा ती अस्वस्थ व्हायची. बऱ्याचदा ती जाणीवपूर्वक फोन उशिरा उचलत असे. मी नेहमी तिची प्रत्येक गोष्ट न्याहरत बसायचो. आधी तिच्या चेहऱ्यावर असलेले हसू फोन आल्यावर मात्र गायब व्हायचं.
तिच्या बोटात असलेली तिच्या साखरपुड्याची अंगठी मी पाहिली होती. त्यामुळे मी समजून चुकलो होतो की येणारा फोन तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा असेल. पण त्याच्या आवाजावरून कधीच असे वाटत नव्हते की समोरचा इसम तिच्या वयाचा असेल. कुणी वयोवृध्द व्यातीचा तो आवाज वाटत होता. पण तिच्या नेहमीच्या पेहरावावरून मला कळून चुकलं होतं की तिच्या घरची परिस्थिती हवी तशी चांगली नव्हती. म्हणून कदाचित तिचे लग्न तिच्या संमतीशिवाय घरच्यांनी वयोवृध्द पैसेवाल्या सोबत ठरवले असेल.
एक दिवस तर हद्द पार झाली. समोरच्या व्यक्तीने फोनवर तिला खूप साऱ्या घाणेरड्या शिव्या घातल्या. फोनचा आवाज जास्त असल्याने जणू आजूबाजूच्या सर्वांना त्याचे बोलणे ऐकू गेले होते. बरेच लोक हसत होते पण मला मात्र खूप वाईट वाटले. त्या दिवशी ती खूप रडली. त्या दिवशी मला खूप मनापासून वाटत होते की तिच्याशी बोलावे. तिचे सुद्धा काही मन असेल, तिच्या मनातल्या गोष्टी जाणून घ्याव्या. पण तिच्यासाठी मी अनोळखी होतो ती माझ्याशी का बोलेल? म्हणून मी ही गप्प राहिलो. तिचे दुःख मी समजू शकत होतो पण काहीच करू शकत नव्हतो.
आज ह्या गोष्टीला आठवडा झाला होता. त्या दिवसापासून ती मला मेट्रो मध्ये दिसली नाही. कदाचित तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला जॉबला येण्यासाठी परवानगी दिली नसावी. माझी नजर रोज तिला आता शोधतेय पण ती काही मला दिसत नाही. माझे तिच्यासोबत कोणतेही नातं नसताना सुद्धा एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. ते प्रेम होतं? मैत्री होती? की फक्त माणुसकी ह्याचे उत्तर मलाही अजुन माहीत नाहीये.