कथा
जेव्हा १३ वर्षानंतर आई भेटते

आज खूप वर्षांनी तिला असे समोर पाहिलं आणि हृदयाचे ठोके आपसूक वाढले. डोळ्यात अश्रू साठले. हात पाय थंडगार पडले. तेरा वर्ष खूप काही बदल होतात. एवढ्या मोठ्या काळात पण ती नव्हती बदलली. तिचं लाल रंगाची साडी, तोच हसरा चेहरा आणि तशीच सडपातळ अंगकाठी, काहीच बद्दल नव्हते घडले.
मी तिला आवाज दिला पण आनंदाश्रुनी माझा घसा एवढा कोरडा पडला होता की माझ्या तोंडून आवाज निघत नव्हता. खूप प्रयत्न करून मी आवाज दिला ‘आई ‘ आवाज देताना कंठ अगदी दाटून आलेला. त्या एका हाके नंतर अश्रूंना ही वाट मोकळी झाली आणि मी हुंदके देऊन रडले. आईने मला जवळ तिच्या मिठीत घेतलं आणि माझ्या मनात साचलेल एवढ्या वर्षांचं दुःख आपोआप कमी झालं. तिला घट्ट मिठी मारून मी इतक्या वर्षांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. ती उणीव कधीच भरून निघणारी नसेल कदाचित पण एक आनंद होता.
आई तेरा वर्षांनी भेटल्याचा आणि त्याची तोड कशालाच नव्हती. मी आईला विचारलं आई तू का अशी अचानक गेलीस ग. तुझ्याशिवाय जगण्याच्या वेदना खूप असह्य आहेत. जग परक वाटत ग तुझ्याशिवाय, तुला माझी कधीच आठवण नाही आली का ग. आईच्या पण डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली बाळा हो अग म्हणून तर मी आज आले आहे ना. मला माहित आहे तुम्हाला असे एकट सोडून जाणं योग्य नव्हत पण माझ्यासमोर काहीच पर्याय नव्हता ग. तुम्ही दोघी एकमेकांना साथ द्या आणि आयुष्य आनंदात जगा. माझी काळजी करू नका मी ठीक आहे आणि हो बाबू तो तर आता दुसऱ्या घरी गेला आहे. तिथे त्याला खूप छान माणसं भेटलीत त्याची काळजी करणारी, त्याचे लाड करणारी, माझी तिन्ही मूल सुखात आणि आनंदात असतील तर एका आईला आणखी काय हवे असेल.
मी आज असे अचानक येण्या मागचं कारण एकच आहे. कोरोना व्हायरस आला आहे आणि तुला इन्फेक्शन लगेच होत ना सोन्या. तू बाहेर नको जाऊस आणि शामुला पण बाहेर नको जाऊ देऊस. मी गेल्या नंतर एक – एक करून सगळेच तुमच्या पासून लांब गेले आणि तुम्ही एकट्या पडलात. पण एकमेकांची साथ देऊन एवढ्या मोठ्या झाल्यात ना ह्या पेक्षा जास्त आनंद मला कसला असू शकतो. मला माहित आहे तुम्हाला माझी खूप आठवण येते मला पण येते सोन्या. माझ्या दोन्ही बाळांची आठवण येते मला पण मी तेव्हा रडत नाही कारण माझ्या रडण्याने तुम्हाला त्रास होईल. मी तुमच्या सोबत नसले तरी काही माणस माझ्या रुपात तुमच्या आजूबाजूला आहेत तुमची काळजी घ्यायला तुमच्यावर प्रेम करायला.
तेव्हा आता रडत बसायचं नाही स्वतःची काळजी घ्यायची आणि हो खूप मोठं व्हायचं. माझी सगळी स्वप्न तुम्ही दोघींनी पूर्ण करायची. आज पर्यंत आलेल्या प्रत्येक संकटाला तुम्ही मोठ्या धैर्याने तोंड दिलं. तसच ह्या संकटालाही द्याला ह्याची मला खात्री आहे. आई माझे डोळे पुसत आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत आई हे सगळे माझ्या सोबत बोलत होती. खूप वर्षांनी तिचा स्पर्श आणि तिची माया मी माझ्या हृदयात साठवत होते आणि त्या मायाळू स्पर्शाने कधी शांत झोप लागली समजलच नाही.
बहिणीच्या आवाजाने जाग आली. अग उठायचं नाही का सकाळचे अकरा वाजलेत आणि मी ताडकन उठून बसले. आजूबाजूला पाहिलं तर बहीण किचन जवळ काहीतरी करत होती. म्हणजे ते एक स्वप्न होत तर..आई माझ्या स्वप्नात आलेली. आई आणि लहान भाऊ तेरा वर्षांपूर्वी एका अपघातात वारले. ते सप्न..एक भास..एक माया..एक काळजी आणि आई आज खूप वर्षांनी तिला असे समोर पाहिलं होत.
Patiljee