कथा

कोविड योद्धा

मानवी मनाच्या विचारापलीकडे कोरोना आजार जाऊन पोहोचलाय. आज ह्याच्यापुढे सगळ्यांनी हात टेकलेत. कधीच वाटलं नव्हतं की एखादा अदृष्य विषाणू संपुर्ण जग हादरवून टाकेल. चीन मधून सुरू झालेला ह्या भयावह विषाणूने बघता बघता संपूर्ण जग काबीज केले. बाकीच्या देशात माजलेला हाहाकार विविध माध्यमांवर बघायचो. पण कधीही विचार केला नव्हता की आपल्या भारतभूमीवर हा पराक्रम करू शकेल. मार्चमध्ये ह्यांनी दमदार एन्ट्री भारतात केली. आणि त्यासोबत कॉरन्टाईन, आयसोलेट, मास्क, सॅनिटायझर असे रोजचे नवनवीन शब्द कानावर पडू लागले. शासनाच्या सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. सगळे डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, पोलीस यंत्रणा ह्यांची अचानक जबाबदारी वाढली. हॉस्पिटलमध्ये वेगळा वॉर्ड करण्यात आला. परंतु पाहिजे तसा हा रोग आटोक्यात न आल्याने शेवटी शासनाने नवीन हत्यार बाहेर काढले, ते म्हणजे लॉकडाऊन, टाळेबंदी.

बस्स, नेहमीची धावपळ थांबली. सगळी दुकाने, उद्योगधंदे, कारखाने अचानक ठप्प झाली. आजपर्यंत कधीही बंद नसलेली मुंबईची लाईफलाईन म्हणजे रेल्वे सुद्धा बंद झाली. रस्ते निर्मनुष्य झाले. रेल्वेचे व गाड्यांचे हॉर्न, प्लॅटफॉर्मवरच्या सूचना, सायरन, ती नेहमीची आरडाओरड, धक्काबुक्की सगळं काही शांत झालं. परंतु माणसाच्या दैनंदिन गरजा मात्र शांत झाल्या नव्हत्या. त्या खाण्या पिण्याच्या गरजांसाठी माणसं हवालदिल झाली होती. ह्या सगळ्यांवर उपाययोजना म्हणून BMC ने सरकारी कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी ह्यांच्या साहाय्याने दोन वेळच्या शिजवलेल्या अन्नाची पाकीट वाटण्याचा निर्णय घेतला, आणि सगळ्यांसोबत जीव धोक्यात घालून हे सरकारी कर्मचारी काम करू लागले. हे काम करत असताना ह्यातील एक सरकारी कर्मचारी शहीद झाला, तर अनेक कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तरी देखील हे कर्मचारी मागे हटले नाहीत कारण त्यांना नोकरी बरोबर राष्ट्रीय कर्त्यव्याची अधिक जाण आहे. ह्यातून अजून एक नवीन शब्द उदयाला आला तो म्हणजे “कोविड योद्धा”. अश्याच योध्याची ही कथा आहे.

रायगड जिल्ह्यातील, अलिबाग मधल्या एका छोट्याशा गावातील रहिवासी विश्वास हा बरीच वर्षे मुंबई महापालिकेच्या सेवेत चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होता. साधारण ३५ ते ४० वयोगटातील, चेहरा नेहमी हसरा, नेहमी नवीन काहीतरी करण्याचा ध्यास, लोकांना मदत करण्याची आवड, मनाने हळवा, अंगाने एकदम सडपातळ, डोक्यावर केस तसे कमीच, असं एक हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे विश्वास. महापालिकेने ह्याला एका विशिष्ट विभागाची जबाबदारी दिली होती, त्यामध्ये दोन्ही वेळच्या जेवणाची हजारो पाकिटं लोकप्रतिनिधी ह्यांची मदत घेऊन गरजूपर्यंत पोहीचविणे, कोणी अडचणीत असेल तर त्यांना मदत करणे अश्या प्रकारची कामे होती.

नेहमीप्रमाणे आज सकाळी विश्वास वेळेच्या आधी कामावर हजर होता. वरिष्ठांनी त्याच्याकडे काही कॉन्टॅक्ट नंबर दिले आणि सांगितले की तुझ्या विभागातील काही गरजू लोकांचे हे नंबर आहेत. ह्यांच्याशी संपर्क साधून ह्यांना मदत कर. जरी हा कामाचा भाग असला तरी विश्वास मात्र हे सगळं जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करत होता. सगळ्यांशी संपर्क झाला आणि त्यांना ज्याप्रकारे जी मदत हवी होती त्याप्रकारे त्यांना सहकार्य केले. आता एक शेवटच्या नंबरवर कॉल केला. नमस्कार, मी विश्वास बोलतोय, BMC कार्यालयातून.

समोरून एका स्त्रीचा आवाज आला. हा साहेब नमस्कार! मी सुगंधा पवार, विश्वास: तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये संपर्क केला होता ना? काय मदत हवी होती तुम्हाला? सुगंधा: साहेब! धान्य किंवा काही पैशाची मदत होईल का? विश्वास: नाही. धान्य किंवा पैसे अशी मदत इथून नाही होत. इथे फक्त शिजवलेलं अन्न ह्याची मदत होते. धान्य आलं तर तुम्हाला संपर्क करण्यात येईल. सुगंधा: चालेल साहेब! नक्की सांगा.

एवढं बोलून संवाद संपला आणि विश्वास नेहमीच्या कामामध्ये व्यस्त झाला. परंतु ही स्त्री रोज सकाळी फोन करून विचारायची की साहेब ते धान्य किंवा काही मदत आली आहे का?? असे सतत ४ ते ५ दिवस चालू होते. ही स्त्री खरोखर गरजवंत असेल, पण आपले हात बांधलेले आहेत. काय करावं काही सुचत नव्हतं. शेवटी विश्वासने त्या स्त्रीला कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या पतीला किंवा मुलाला इकडे पाठवून द्या. त्यावर ती लगेच म्हणाली की, माझा नवरा आजारी असतो आणि मुलगा लहान असल्याने मीच स्वतः येते. काही वेळाने ती ऑफिसमध्ये आली.

४० ते ४५ वयाची एक स्त्री, अंगावर मळलेली नायलॉनची साडी, पती जिवंत आहे ह्याची खूण म्हणून गळ्यात काळ्या मण्यांची एक पोत, विस्कटलेले केस, बरेच दिवस अंघोळ केली नसावी अश्या अवस्थेतील ती स्री म्हणजेच सुगंधा पवार विश्वासच्या समोर उभी होती. साहेब काही पैशांची मदत होईल का? अहो पण, तुम्हाला दोन वेळेचं शिजवलेलं अन्न जर मिळत असेल तर पैशाची गरज काय आहे? विश्वास उत्तरला.

तिने लगेच सांगितलं की, माझे पती एका दुर्धर रोगाने पीडित आहेत. त्यांना रोजच्या औषधांना पैसे लागतात. मुलगा एकदम लहान आहे. घरकाम करून मी आमचा खर्च भागवत होती. परंतु अचानक सगळं बंद झाल्यामुळे कोणी कामाला बोलवत नाही. ज्यांच्याकडे काम करायची त्यांच्याकडून आधीच पैसे ऊसणे घेतले आहेत. अश्रुनी भरलेल्या डोळ्यातून तिच्या अठराविश्व दारिद्र्याची कथा सांगत होती. हे सगळं ऐकून विश्वासने आपल्या खिशातून ५०० रुपयांची नोट काढून तिच्या हातावर टेकली आणि बिर्याणीची ४ पाकीटं दिली.

मळलेल्या पदराने डोळे पुसत सुगंधा विश्वासला THANK U बोलून निघून गेली. ती ५०० रूपयांची मदत तिला आज ५ लाखांप्रमाणे वाटत होती. विश्वासला सुद्धा त्यातून आत्मिक समाधान वाटले. आपल्याला PM किंवा CM फंडाला मदत करता आली नाही, परंतु योग्य कुटुंबाच्या हातात ही मदत गेल्याने तो आनंदित होता. आज विश्वासच्या ह्या दातृत्व स्वभावामुळे पुन्हा एकदा कोविड योद्धा कसा असतो ह्याची ओळख जगाला समजली. अलिबागच्या मातीतले संस्कार, उत्कृष्ट विचार, दातृत्व हे सगळं आज विश्वासच्या वागण्यातुन दिसून आले आणि ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

अश्या अनेक कोविड योध्याना मग ते भारताचे पंतप्रधान असोत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री असोत, समस्त पोलीस व्यवस्था, डॉक्टर, नर्स, हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, बँकर, अत्यावश्यक सेवेत असणारे सर्व कर्मचारी असोत, किंवा घरात बसून लॉकडाऊनचे नियम पाळणारा सर्वसामान्य नागरिक असो, अश्या एक नाही तर अनेक कोविड योध्याना माझा मानाचा मुजरा

ही कथा नसून एक सत्य हकीकत आहे. आज कित्येक कुटुंबाची परिस्थिती ह्या सुगंधा पवार सारखी आहे. फक्त सरकारला दोष देत राहण्यापेक्षा, त्यांच्या चूका काढण्यापेक्षा आपण स्वतः पुढे होऊन गरजू लोकांना मदत करायला पाहिजे. स्वतः कृतीत उतरणे सध्या काळाची गरज आहे.

श्री. अतिष म्हात्रे, आगरसुरे- अलिबाग.

(कथेतील पात्रांची नावे ही काल्पनीक आहेत. ही घडलेली सत्य घटना माझे जवळचे मित्र महापालिका कर्मचारी असून ते महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यात कार्यरत आहेत, त्यांनी मला सांगितली आणि मग मी माझ्या लेखणीतून शब्द संकलन करून ह्या लेखात उतरवण्याचा प्रयत्न केलाय.)

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close