कथा
लग्न

आज परत एकदा दर्शना घरी आली. नवऱ्याने आजसुद्धा तिला बेदम मारहाण केली होती. तिच्यासोबत असे काही घडण्याची ही काय पहिलीच वेळ नव्हती. ह्या अगोदर सुद्धा तिच्या नवऱ्याने तिला खूप वेळा मारझोड केली होती. घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांचे वाद व्हायचे. जेवायला अमुक अमुक पदार्थ का केलास? घरात आल्यानंतर माझ्याशी हसलीस सुद्धा नाही, रोज एवढी ऑनलाईन का असतेस? आईला सर्व काम का सांगतेस? अशा अनेक कारणावरून तो रोज तिला मारत असे.
दर्शना सुद्धा कंटाळली होती. अडीच वर्षांची मुलगी होती म्हणून ती गप्प बसत असत. जर मी ह्याला घटस्फोट दिला तर समाज माझ्या मुलीला हवी तशी वागणूक देणार नाही. हाच विचार करत ती गप्प बसायची. जेव्हा जेव्हा नवरा तिला मारायचा तेव्हा ती सर्व सहन करायची. एक दोन वेळा तिने ही प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या कानशिलात लगावल्या होत्या. पण त्यांनतर मात्र नवऱ्याने दोरखंडाला बांधून दर्शनाला खूप जास्त मारली होती. तोंडातून रक्त येत होत एवढी तिची मारहाण केली होती. एक हात तर पूर्ण सुन्न झाला होता.
नवरा घरी नसताना हातात जे सामान मिळेल ते उराशी घेऊन इवल्याश्या जीवाला घेऊन तिने माहेर गाठले. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून वडिलांना खूप वाईट वाटले. त्यांनी दर्शनाला डॉक्टरकडे नेले. घरी आल्यानंतर तिने नवऱ्याकडे जाण्यास नकार दिला. त्या नराधमाच मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये. पण आईने तिची समजूत काढली. अग बाळा संसारात अशा अनेक गोष्टी होत राहतात. मी पण एवढ्या वर्षात ह्यांच्याशी कितीतरी वेळा भांडले आणि ते सुद्धा माझ्याशी कितीतरी वेळा भांडले आहेत. पण मी अशी घर सोडून गेली का कधी? अग आई बरोबर आहे तुझे पण बाबांनी तुला कधी मारझोड केली नाही. हा माणूस मला जनावरासारखा मारतो. माणूस आणि जनावर ह्यातील फरक सुद्धा त्याला कळत नाही.
हो बाळा कळतेय मला ते, मी आणि बाबा उद्या त्याच्या घरी जाऊन त्याला समजावू. तू काळजी नको करुस आता नाही मारणार तुला तो. पण अशी नाही जाणार असे बोलू नकोस. जर तू घटस्फोट घेतलास तर समाजात आपला काय मान राहील? आणि एकल्या बाईला आयुष्य काढणे खूप कठीण असते ग मुली. ठरल्या प्रमाणे आई बाबा जाऊन नवऱ्याला समजावून आले. दुसऱ्या दिवशी दर्शना सासरी परत गेली. इच्छा तर नव्हती पण घरच्यांच्या आग्रहाखातर ती परत आली होती. पण त्याच्यात काडीमात्र बदल झाला नव्हता. दारू पिऊन आल्यावर पिसाटलेल्या कुत्र्यासारखे शरीराचे लचके तो तोडायचा. मनात नसताना नाही नाही ते करून शरीराची भूक भागवायचा.
दर्शना फक्त जगत होती पण जगण्याची इच्छा मात्र तिची कधीच उडाली होती. एक दिवस तिच्या आई बाबांना दर्शना नाही राहिली असा मेसेज मिळाला. तिने रॉकेल ओतून स्वतःला आणि त्या इवल्याश्या जीवाला संपवून घेतलं होतं. पण तिचे आई बाबा हो गोष्ट मानायला तयार नव्हते की तिने स्वतःला संपवले. कारण लहानणापासूनच तिला आगीची भीती वाटते आणि एवढा मोठा पाऊल ती उचलूच शकणार नाही. तिला नवऱ्याचे मारली असा त्यांचा संशय आहे.
पण आता आई बाबांना आपल्या वागण्याचा पच्छाताप होतोय. का नाही दर्शनाचे ऐकले आम्ही? का तिला परत जाऊ दिलं? पण आता ह्या गोष्टींसाठी वेळ निघून गेली आहे. कोर्टात केस तर टाकली आहे पण त्याच्याकडे पैसा जास्त असल्याने कदाचित तिचा नवरा सुटेलही ह्यातून. जेव्हा वेळ होती तेव्हा आम्ही मुलीचे ऐकले नाही आता मात्र काहीही करू शकत नाही.
पाटीलजी
Very sad
रघुनाथ बाबू राठोड